December 6, 2010

अक्षय कविता

तुला कसे कळत नाही?
फुलत्या वेलीस वय नाही!
क्षितिज ज्याचे थांबले नाही,
त्याला कसलेच भय नाही,
त्याला कसलाच क्षय नाही....

असाच काहीसा अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली बोरकरांची लख्ख आरस्पानी कविता. लयीत उलगडणारी आणि शब्दचित्रांचा उत्कट अनुभव वाचकांसमोर अलगद आणून ठेवणारी, अशी. कवितेची जातकुळीच अर्थगर्भित. चित्रवाही शब्दकळेचे लेणे ल्यालेली. आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाला तितक्याच समरसतेने आपलंसं करुन, अनुभवून आपल्या अवधूती मस्तीत धुंद होताना, त्या अनुभवांचा मुक्त उद्घोष करणारी, शुद्ध अभिजात अशी ही कविता. आत्मनिष्ठ.

बोरकरांनीच म्हटल्याप्रमाणे, त्यांनी कधी कविता केल्या नाहीत, बोरकरांना कविता झाल्या. त्यांचे शब्दही शब्दवतीचा साज धारण करुन आलेले आणि चराचराच्या रंगागंधांमध्ये नाहून निघालेले. भोवतालच्या सृष्टीला हाक घालणारे, पण ती कशी? नुसतीच नव्हे, तर नादवेडात रंगून आणि गंधाटून!

मी रंगवतीचा भुलवा
मी गंधवतीचा फुलवा
मी शब्दवतीचा झुलवा
तुज बाहतसे....

असं म्हणत. रंगांची भुलावणी शब्दांच्या फुलोर्‍यात पेरुन, त्यांचे झुलवे गात मारलेली हाक.

कवींचा मूळ पिंडच सौंदर्योपासकाचा. हिरवळ आणिक पाणी, तेथे स्फुरती मजला गाणी अशी भाववेडी अवस्था. इतर कोणत्याही ओळखीपेक्षा, पोएट बोरकर हीच त्यांची स्वतःशीही असलेली खरी ओळख. मनातून आणि शब्दांतून ओसंडत असलेले कवीवृत्तीचे इमान. "मी प्रतिभावंत आहेच, पण प्रज्ञावंतही आहे" हे सांगण्याची आणि ओळखण्याची शक्ती. जोपासलेला निगर्वी अभिमान. स्वतः सरस्वतीपुत्र असल्याची सतत जागती जाणीव.

कवितांविषयी बोरकरांची धारणा मुळातूनच वाचण्यासारखी आहे. बोरकरांच्या मते काव्य ही अध्यात्मिक साधना.

"लौकिक जीवनात राहणार्‍या कवीला जेव्हा अलौकिकाची जाणीव प्राप्त होते, तेह्वा तो केवळ कवी रहात नाही, पण संतही होतो. आपल्या देशात तरी वारंवार असे घडत आले आहे. कवी जगात इतर ठिकाणीही झाले आहेत, पण त्यातले संत झाले, असे फारच थोडे. असे का व्हावे? मला वाटते, हा फरक काव्याकडे पाहण्याच्या दृष्टीमुळे पडतो. काव्य ही एक अध्यात्मिक साधना आहे. आत्मविद्येचा हा एक आगळा आणि लोभसवाणा अविष्कार आहे. लय, योगाची ही एक हृदयंगम कला आहे, असे ज्यांनी मनापासून मानले आणि या साधनेची वाट जे शोधीत, चोखाळीत राहिले, ते संत झाले आणि ज्यांनी काव्य, कला हा एक शौक किंवा छंद मानला ते कवीच राहिले किंवा कवी म्हणून देखील फार लवकर संपले, असे आढळून येईल..."

कवितेची चाहूल घेता घेता लौकिकातून अलौकिकाच्या जगात मुशाफिरी करणारं कवीमन, आणि अशा ह्या कवीची आयुष्याकडे पाहताना, ते अनुभवताना आणि चराचराला न्याहाळताना, सहजरीत्या त्यातल्या सौंदर्यठश्यांचा वेध घेत, त्यांचे सौंदर्यसुभग तराणे बनवत, नाद, सूर, लय आणि शब्द ह्यांना सांगाती घेऊन जन्माला आलेली, चिरंतनाचे गाणे बनून गेलेली अशी कविता.

छंद माझा दिवाणा,
नकळत मन्मुखी सुंदरतेचा तरळे तरल तराणा..
स्वसुखास्तव जरी गुणगुणतो मी
हर्ष कणकणी उधळी स्वामी
प्रकाश पाहूनी अंतर्यामी
सोडवी गहन उखाणा....

ह्या कवितेला आतूनच जीवनाची ओढ आहे. सुख, दु:ख, एखादा निरव नि:स्तब्धतेचा वा सुखावणारा समाधानाचा क्षण, ह्या सार्‍याला ही कविता शब्दाशब्दांने आपलं म्हणते, आतल्या खुणा उकलू पाहते आणि ज्ञानियाच्या अमृत ओवींच्या संगतीने मनातलं द्वैत उजळत, स्नेहभावाने सामोरी येते.

गोव्याच्या भूमीचं सौंदर्य आणि हिरवा निसर्ग, तिथल्या मातीचा गंध, समुद्राची गाज, पोफळी, माडांच्या झावळ्यांची सळसळ... गोव्याच्या भूमीचं सारं सारं ताजेपण बोरकरांच्या कवितेतून उमलून येतं आणि मग तिथल्या नारळाची चव मधाची होते आणि दर्‍यां कपार्‍यांतून नाचत, खळाळत उतरणारं पाणीही दुधासारखं भासतं. जगाला आपल्या सौम्य रुपाने आल्हाद देणार्‍या चांदण्याला माहेरी आल्याचं समाधान इथेच मिळतं, आणि अबोल, शालीन अशा चाफ्याच्या साक्षीने निळ्या नभाशी समुद्र गळाभेठी इथेच करतो. गोव्याच्या निसर्गाची घडोघडी दिसणारी वेगवेगळी रुपं, बोरकरांच्या कवितेत वेगवेगळ्या भावनांना चित्ररुप देतात...

ही कविता, मराठी सारस्वताचे, लावण्यमयी लेणे आहे. संतवाङमयासारखी प्रासादिकता, संस्कारक्षम मनाची शुचिता त्या कवितेत आहे हे खरेच. पण, म्हणून त्या कवितेला विमुक्त मनाच्या रसरंगाचे वावडे नाही...उलट तिला तर सौंदर्याची, जीवननिष्ठेची अनादि, अनंत अशी धुंद भुरळ पडलेली! मनाच्या गाभ्यात उत्कट आनंदाचा आणि चैतन्याचा लामणदिवा सतत तेवता! गाढ सुखांनी भरुन येणारी आणि मुक्तपणे आपल्या भावना व्यक्त करणारी ही कविता. ती प्रीती व्यक्त करताना तरी संकोच का बाळगेल? आणि प्रीतीतून उमलणार्‍या रतीचे आदिम आकर्षण नाकारण्याचा करंटेपणा तरी का करेल? प्रीती आणि रती तितक्याच ताकदीने, तरलतेने आणि संवेदनक्षमतेने उलगडत नेणारी, आणि इंद्रियानुभवांमध्ये समरसणारी ही कविता. तिने अनुभवलेल्या इंद्रदिनांचा प्रभाव तिच्या मनपटलावरुन पुसून जायलाच तयार नाही!

इंद्रदिनांचा असर सरेना
विसरु म्हटल्या विसरेना
चंद्रमदिर जरी सरल्या घडी त्या
स्वप्नांची लय उतरेना...

जीवनाबद्दलची आसक्ती, ऐहिकाबद्दलचे प्रेम व्यक्त करताना संकोच कसला? ह्या कवितेला रतीभावना प्रिय आहे आणि प्रीतीभावना हा तर तिचा प्राण आहे... आणि तरीही, ह्या रती प्रीतीत गुरफटून जात असतानाही, जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीवही सुटलेली नाही. तेही शाश्वत बनवायचे आहे, तेही ह्या रती प्रीतीच्या साक्षीनेच!

क्षणभंगूर जरी जीवन सखे
सुखसुंदर करु आपण
सखे गऽ शाश्वत करु आपण....

शरीराची असक्ती, शृंगार नि:संकोचरीत्या व्यक्त करताना ही कविता धुंद शब्दकळेने नटते, पण तरीही तिचा कुठे तोल सुटत नाही की कुठे शब्द वाकुडा जात नाही. मनापासून, हृदयातून उमटलेल्या शब्दांमधे नावालादेखील हीण सापडत नाही...

तुझे वीजेचे चांदपाखरु दीपराग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात..

किंवा,

केळीचे पान पहा उजळ किती, नितळ किती
वाळ्याने भिजलेले उर्वशीचे वस्त्र उडे,पौषातील उन गडे....

हृदयातून उमाळत, उसासत येणार्‍या उत्कट भावना आणि इंद्रियाधिष्ठित संवेदना शब्दांतून अलगद जिवंत करणारी ही प्रत्ययकारी कविता.

हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी
पोहू लागले तुझ्या रेशमी अलकातील मासे
हवा जाहली जड पार्‍यासम अंगातील वासें
आणि तरंगत डुलू लागली नौकेपरी शेज
तो कांतीतूनी तुझ्या झळकले फेनाचे तेज
नखें लाखिया, दांत मोतिया, वैदूर्यी नेत्र
अवयव गमले चपल चिवट की मयवनीचे वेत्र
कात सोडिल्या नागिणीचे ते नवयौवन होतें
विलख्याविळख्यातुनी आलापित ज्वालांची गीतें
गरळ तनूतील गोठूनी झाले अंतरांत गोड
कळले का मज जडते देवां नरकाची ओढ

आणि तरीही केवळ शृंगार भोगात आणि इंद्रियाधिष्ठित अनुभवांच्या आसक्तीत गुंतून राहणारी ही कविता नव्हे. तिची अनुरक्ती केवळ भोगविलासापुरती मर्यादित नाही. त्यापलिकडे जाणार्‍या चिरंतन सहजीवनाची आणि स्निग्ध, समंजस अशा समर्पित नात्याची तिला जाणीव आहे. भान आहे, मोह आणि आकर्षणदेखील आहे.

तुला मला उमगला जिव्हाळा जन्माचा पट फिटला गं,
अन् शब्दांचा प्रपंच सगळा कमळासम हा मिटला गं...

तिच्या अंतरंगात प्रीतीचा अमृतझरा सतत झुळझुळत वाहता आहे..

प्रीत वहावी संथ ध्वनीविण या तटिनीसारखी
नकळत बहरावी या हिरव्या तृणसटिनीसारखी
स्पर्शकुशल झुळुकेसम असूनी कधी न दिसावी कुणा
तिल असावा या घंटेचा सूचक शीतलपणा
तिने फिरावे या खारीसम सहजपणे सावध
ऊनसावलीमधून चुकवीत डोळ्यांची पारध...

तिने अंतरंगातली माया, प्रेम जाणले आहे. शरीराच्या तृष्णेवीण रस कुठला प्रीतीला हे सांगणारी ही कविता, आयुष्याच्या शेवटीही आपले चिरतारुण्य जपते, आपल्या सखीच्या लावण्याला ती चिरवश आहे.. सखीच्याच हाताची सोबत घेऊन ह्या कवितेला गतायुष्याच्या आठवणींत रमायचे आहे. तिच्याबद्दलची कृतज्ञता आणि मनातून ओसंडून जाणारे प्रेम व्यक्त करायचे आहे...

शरदातील ओढ्यासम निर्मल
तुझा नि माझा ओढा
चार तपांनंतरही तू मज
सोळाचीच नवोढा...

सखीचा हात कधी मधेच सोडून द्यावा लागेल की काय किंवा सुटला तर ह्या भावनेने ती हुरहुरतेही, पण कधीतरी निसर्गनियमाप्रमाणे ताटातूट होणार हे सत्यदेखील ही कविता जाणते. असं असलं तरीसुद्धा आता सखीच्या अस्तित्वाने तिचे भावविश्व अष्टौप्रहर, अंतर्बाह्य असे काही व्यापले गेले आहे, की आता ताटातूट तरी होईलच कशी?

तशी आठवण येत नाही... भेटीचीही काय जरुर?
सूर वाहे ऊर भरुन, घरातदेखील चांदणे टिपूर
इतके दिवस हसतरुसत वाटले सृष्टीत नटली आहेस
आता कळले खोल खोल माझ्याच दृष्टीत मिटली आहेस
अंध होऊन हुलकावण्यांनी अवतीभवती राहिलीस खेळत
आता माझ्यात श्वास होऊन वहात असतेस सहज नकळत
कधी कामात, कधी गाण्यात फुलता फळता भानात नसतो
तुला विसरुन अष्टौप्रहर.... अष्टौप्रहर तुझ्यात असतो...

आणि तरीही, रसरंगात आणि प्रीतीत गुरफटून जाणार्‍या ह्या कवितेने मनात एक गोसावीपणही जपले आहे.


क्रमशः

2 comments:

यशोधरा said...

Shraddha Bhowad said
पहिल्या ओळी मनापासून आवडल्या म्हणून पोस्ट वाचायला सुरुवात केली तर ती बोरकरांवर निघाली.
माझा आणि बा.भ.बोरकरांचा संबंध?
माझ्या गोव्याच्या भूमीत- इयत्ता-आठवी सन-१९९८
बास्स! त्यानंतर नल्ला.
मला स्वत:ला ग्रेस मनापासून आवडतात. पण त्यांच्या त्या दिक्काल धुक्यासारख्या कवितेमधून पडत-धडपडत, अडखळत धुक्यापलीकडच्या अर्थाकडे जावं-हे नेहमीचंच असलं तर अर्थ विनासायास हाती लागला तर का नाही आवडणार?
" रतिलंपट मी असुनी मजला गोसावीपण भेटे-
माझे सुख मोठे, सुख मोठे"
बोरकरांच्या तू दिलेल्या कविता तरी मला अशाच वाटल्या-हाताशी येणारया.
आपल्याला खूप खूप भूक लागलेली असल्यावर घरी येऊन आपल्याला काही करायला न लागता कोणी आयता नाश्ता आणून दिला की कसं उगाच हसू यायला लागतं? त्यानंतर उगाच़च रडायला यायला लागतं?तसं झालं माझं.
तुझ्या-माझ्यातलाच वाटला मला हा कवी. "बघा! तुम्हालाही कळेल कधीतरी" म्हणून कडी-कुलुपात बंदीस्त ग्रेस सारखा रहस्यमय नाही.
बोरकरांच्या आणखी कविता वाचेन म्हणते. तुला जमलं तर टाक ना ब्लॉगवर.

यशोधरा said...

thanks Shraddha